Ad will apear here
Next
माणुसकीची कसोटी!


रिकी मनॅलो नावाचा एक धर्मगुरू सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. वातावरण स्वच्छ होते. हवेत चांगलाच गारठा होता. अशा वातावरणात सकाळचा फेरफटका आणखीनच सुखद होतो. रिकी स्वमग्नपणे रस्ता कापत होता... आणि अचानक मागून एक ट्रक रोरावत आला... त्याच्या अगदी शेजारी येताच ट्रकचालकाने ब्रेक दाबला. ट्रकचा वेग संथ झाला... आता रिकीच्या पावलाच्या वेगाने ट्रक त्याच्या बाजूने पुढे सरकत होता. क्षणभर त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्या गारठ्यातही त्याला घाम फुटला आणि त्याने वेग वाढविला. पण ट्रकला मागे टाकून पळणे शक्यच नव्हते. ट्रकनेही वेग वाढविला. आता अगदी काही फुटांच्या अंतरावरून ट्रक त्याच्यासोबत चालत होता. काही क्षणांनंतर ट्रकच्या खिडकीची काच खाली झाली आणि आत बसलेला एकजण कुत्सित आणि दहशतीच्या आवाजात रिकीकडे पाहात ओरडला, ‘हे... व्हायरस... एशियन व्हायरस!’... 

मग ट्रकमधील सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहात टोमणेबाजी सुरू केली.

वंशद्वेष आणि प्रांतभेद जन्म घेतोय, याचा पुढच्याच क्षणाला रिकीला अंदाज आला. त्याने रस्ता सोडला आणि धूम ठोकली. धापा टाकत तो जवळच्या एका दुकानात शिरला. ते दारूचे दुकान होते. काउंटरवरचा इसम विचित्र नजरेने रिकीकडे पाहत होता आणि भयानक घाबरलेला रिकी काहीच न बोलता उभा होता. आपल्या छातीची धडधडही त्याला स्पष्ट ऐकू येत होती. जवळपास अर्धा मिनिट तो तसाच, भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. काही वेळानंतर तो सावरला, तेव्हा फार मोठा काळ पायाखालून सरकून गेला आहे, असे त्याला वाटत होते... दुकानाच्या मागच्या बाजूला संगीताचा ढणढणाट सुरू होता. गर्दीच्या गप्पांचा आवाज बाहेर येत होता... रिकीने घाबरून पुन्हा एकदा रस्त्याकडे नजर टाकली. तो ट्रक निघून गेला होता. त्याने सुटकेचा सुस्कारा सोडला; पण लगेचच त्याचे मन थरकापले. ही सुटका आहे, की संकटाची सुरुवात... या विचाराने तो अस्वस्थ झाला. पण त्याने जिद्दीने स्वतःस सावरले. आपण वंशद्वेषाचे - मौखिक वंशद्वेषाचे - पहिले बळी ठरतोय, हे त्याला जाणवले होते. त्या ट्रकमधील माणसांच्या तोंडातून बाहेर पडणारे अपमानास्पद शब्द तापल्या तेलासारखे त्याच्या कानात ओतले गेले होते... 

ही घटना अगदी अलीकडची... १६ मार्चची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केले, आणि वंशद्वेषाच्या भयाने अनेक जण ग्रस्त झाले. ध्यानीमनी नसताना रिकीला त्या भयाने गाठले. आता आपण सुरक्षित नाही, या भावनेने आता त्याच्या मनात घर केले आहे...

 ‘नाही... मी एशियन व्हायरस नाही... मी एक माणूस आहे. विषाणू नाही’.. तो मनातल्या मनात ओरडला... एवढ्या जोरात, की त्या आतल्या आवाजामुळे आपल्या कानठळ्या बसतील अशी त्यालाच भीती वाटू लागली...

त्यानंतर अजूनही रिकी सकाळच्या फेरफटक्यासाठी घराबाहेर पडतो. पण आता तो आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेतो... आपले विशिष्ट ठेवणीचे डोळे कोणाच्याही नजरेस पडू नयेत, यासाठी सतत खबरदारी घेत आणि आसपासच्या नजरांचा भयभीत कानोसा घेत त्याची पावले पडत असतात...

कोरोना व्हायरसच्या फैलावानंतरची ही एक प्रातिनिधिक घटना!

गेल्या २४ फेब्रुवारीला, लंडनच्या ऑक्स्फर्ड स्ट्रीट या गजबजलेल्या रस्त्यावर एका चिनी तोंडवळ्याच्या सिंगापुरी विद्यार्थ्यास जबर मारहाण झाली. करोनाच्या नावाने लाखोली वाहत लोकांनी त्याला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी अक्षरशः बुकलून काढले. ‘तुझ्या देशातला करोना व्हायरस आमच्याकडे नको’, असे बोलत त्याच्यावर हल्ला चढविला... कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन तो तिथून पळाला, तेव्हा त्याच्या जबड्याची हाडे मोडली होती. डोळ्याखाली रक्त साकळले होते... आता मोडलेली हाडे जागेवर बसविण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागेल, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले. जोनाथन मोक असे त्याचे नाव... या घटनेचे वर्णन त्याने आपल्या फेसबुक पेजवर केले, त्या शब्दाशब्दांत त्याच्या भयाच्या वेदना उमटलेल्या जगाने अनुभवल्या...(त्याच्या हल्लेखोर तरुणांना आता अटक झाली आहे.)

अशा काही घटना आसपास उमटू लागल्या आहेत. चीनमधून करोनाचा फैलाव सुरू झाल्याच्या भावनेने आणि ट्रम्प यांनी त्याचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केल्यानंतर, पाश्चिमात्यांमध्ये पूर्व आशियाई लोकांविषयी राग धुमसत आहे. लंडनमध्ये ‘स्टॉप हेट –यूके’ नावाची संघटना गुन्हेगारीचे चटके बसलेल्यांना साह्य करते. करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून, वांशिक विद्वेषाचा विखार अनुभवलेल्या अनेकांनी या संस्थेकडे मदतीसाठी धाव घेण्यास सुरुवात केली आहे...

स्वार्थाला ऊत येणे हा या परिस्थितीत पहिला धोका संभवतो. बळावलेला स्वार्थ माणुसकीची भावना गिळू पाहत असतो. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात, करोनाच्या भयामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी सुरू झाली. उद्याच्या गरजा भागविणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सिडनीच्या वेस्टफील्ड वूलवर्थस या दुकानात अलीकडेच ग्राहकांची टॉयलेट पेपरसाठी अक्षरशः झोंबाझोंबी झाली. वाद एवढा विकोपास गेला, की एका महिलेने दुसऱ्या एका ग्राहकावर उगारण्यासाठी चक्क सुरा उपसला... या मानसिकतेमागील भय कोणते रूप घेईल या चिंतेने आता तेथील दुकानदारही धास्तावले आहेत. अनेक दुकानदारांनी तर दुकानांना टाळे लावून घरात बसणे पसंत केले आहे.

करोनाला माणसाभोवतीचा विळखा सोडावाच लागेल. तो नष्ट होईलच, पण या साथीमुळे नव्याच आजाराची, विखाराची भीती आता जगभरात फैलावू लागली आहे. ती म्हणजे, या आजाराने आपली मानवी मूल्ये, माणुसकीचे वेगळेपण हिरावले तर जाणार नाही ना?... जगाचा कोपराकोपरा करोनाच्या भयाने चिंतित असताना, आता या नव्या चिंतेची त्यात भर पडू पाहत आहे. या एका आजाराने माणुसकीच्या भावनेवर आघात सुरू झाला आहे. तो वेळीच आवरला नाही, तर करोनानंतरचे माणसांचे जग कसे असेल, याची चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. करोनाच्या आक्रमणामुळे मने भयभीत आहेतच, कदाचित, कधीच न अनुभवलेल्या या एकटेपणामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे, केवळ स्वतःचे अस्तित्व जपण्याची मानसिकता वाढेल आणि व्यक्तीव्यक्तीच्या मनातील भयाचा सामूहिक फैलाव झाला तर समाजिक अराजक माजेल, याची जाणीव आत्ताच ठेवली पाहिजे. त्यासाठी, माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या, सकारात्मकतेवर भर दिला गेला पाहिजे. या संकटात व्यक्तींमधील अंतर नाईलाजाने वाढले असेल, पण हेच वाढलेले अंतर एकमेकांच्या मनाचे अंतर कमी करण्यास कारणीभूत ठरावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. संकटाचे हे सावट, उजाडणारा प्रत्येक दिवस अनिश्चितता घेऊन येत असल्यामुळे असुरक्षिततेचे भय वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत, माणुसकी नावाच्या भावनेची कसोटी लागते. करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थींना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
त्यासाठी मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे! जगातील प्रत्येकाने!!

- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXECL
Similar Posts
वर्ल्ड ॲट होम... आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे. ‘वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसारमाध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प
दिवस... पक्ष्यांचा आणि माणसांचा! सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजूबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या
आशावाद आणि इच्छाशक्ती... देविदास राठोड हे पालघरजवळील मनोर येथील ५५ वर्षांचे गृहस्थ एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतात. पालघरहून मुंबईच्या केईएम इस्पितळात येणाऱ्या २५ डॉक्टरांना दररोज आणण्या-नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचे घर पालघरपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्या दिवशी त्यांना पालघरला येण्यासाठी एकही
रिक्षा आणि सरकार! सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language